शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

लाखो इथले गुरू!



बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू...
झाडे, वेली, पशु, पाखरे 
यांशी गोष्टी करू!



बघू बंगला या मुंग्यांचा, 
सूर ऐकुया या भुंग्यांचा

फुलाफुलांचे रंग दाखवील 
फिरते फुलपाखरू...
बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू!



सुग्रण बांधी उलटा वाडा, 
पाण्यावरती चाले घोडा

मासोळीसम बिन पायांचे 
बेडकिचे लेकरू...
बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू!



कसा जोंधळा रानी रुजतो, 
उंदीरमामा कोठे निजतो

खबदाडातील खजिना त्याचा 
फस्त खाऊनी करू
बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू!



भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, 
कड्या दुपारी पर्‍ह्यात पोहू

मिळेल तेथून घेउन विद्या 
अखंड साठा करु
बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू!


– ग. दि. माडगूळकर