शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

12 वी नंतरचे डिप्लोमा कोर्सेस



12 वी चे निकाल तर लागलेत पण आता पुढं काय? या विचाराने बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यावरच टेन्शन वाढलंय. कोणता कोर्स घेऊ? करियर नीट झालं पाहिजे, नाहीतर काही खरं नाही. वगैरे विचार त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. हेच टेन्शन पालकांना ही सतावत असतं. बरं, आपल्या मुलाचं भलं व्हावं एवढीच त्यांची इच्छा असते, पण सोबत ही देखील चिंता असते की त्याने योग्य तो कोर्स निवडावा. अशा प्रकारे पालक आणि विद्यार्थी दोन्ही सध्या द्विधा स्थितीमध्ये आहेत. तुमचं हेच टेन्शन काहीसं हलकं करण्यासाठी आज काही हटके डिप्लोमा कोर्सबद्दल माहिती जाणून घेऊयात...
कोर्स निवडण्याआधी सर्वात प्रथम विद्यार्थ्याने खालील प्रश्न स्वत:ला विचारणे गरजेचे आहे?
1) मला काय करायला आवडते?
2) मी त्या कोर्सचा अभ्यास करू शकतो का? मला तो अभ्यास करताना मजा येईल का?
3) मी जे काही करेन त्या जोरावर आर्थिकदृष्ट्या मी सक्षम होऊ शकेन का?
या सर्व प्रश्नांना तुम्ही आत्मविश्वासाने ‘हो’ अशी उत्तरे दिली पाहिजेत. उगाच मित्र घेतोय किंवा कोणी सल्ला दिलाय म्हणून कोणताही कोर्स निवडू नये. चला तर मग खाली काही कोर्सचे पर्याय आहेत…


👉 Diploma in Fashion Designing –
 या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्हाला फॅशन जगताबद्दल आवड असायला हवी. या क्षेत्रात आल्यावर डिझाईन आणि स्टाईल या दोन गोष्टींवरच तुमचं करियर अवलंबून असेल.

👉 Diploma in Yoga –
सध्या जगामध्ये योगाची भलतीच चलती आहे. जर लहानपणापासून तुम्हाला योगा आणि व्यायामाची आवड असेल, इतरांना ते शिकवण्याची इच्छा असेल तर हा कोर्स तुमच्यासाठीच आहे असे समजा.

👉 Diploma in Banking –
 ज्यांना सायन्सची आवड नसते त्यापैकी बरेच जण बँकिंग क्षेत्राकडे वळतात, पण प्रत्येक जण या क्षेत्रात यशस्वी होतोच असे नाही, त्याचे कारण म्हणजे विद्यार्थी बँकिंग क्षेत्राला अतिशय हलक्यामध्ये घेतात. तुम्हाला बँकिंग संबंधित कार्यांची आवड असेल तरच या क्षेत्रात या, अन्यथा डेटा एन्ट्री करण्यात अख्ख आयुष्य जाईल.

👉 Diploma in Financial Accounting –
बहुतेक जण हे क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्र एकच असल्याचे समजतात, पण तसे बिलकुल नाही. सध्या या क्षेत्रामध्ये भरपूर स्कोप आहे. जर तुम्हाला आकडे आणि हिशोब यांच्या संगतीत राहायला आवडत असेल तर हा कोर्स तुम्ही बिनधास्त करू शकता.

👉 Diploma in Industrial Safety –
चाकोरीबाहेरचा करियर ऑप्शन म्हणून याकडे पाहता येईल. प्रत्येक उद्योगामध्ये या क्षेत्राचा समावेश असल्याने बेरोजगार वगैरे राहण्याचा प्रश्नच येत नाही. उद्योगक्षेत्र प्रत्येक आपत्तीपासून सुरक्षित राखणे म्हणजे Industrial Safety. त्यामुळे या क्षेत्रात भविष्य अहवाल आहे.  

👉 Diploma in Physiotherapy –
हा डिप्लोमा खास करून सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जर तूम्हाला रुग्णांची काळजी घेण्याची आवड असेल तर तेच काम हटक्या पद्धतीने करून तुम्ही त्यांना बरे कसे करू शकता ते यात शिकवले जाते.

👉 Diploma in 3D Animation –
या क्षेत्राबद्दल तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. इमॅजीनेशन आणि मेहनत या दोन गोष्टी या कामात अतिशय महत्त्वाच्या. जर तुम्ही कार्टून वेडे असाल आणि अॅनिमेशनचे फॅन असाल तर हा कोर्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो, पण यात पैसा देखील भरपूर खर्च करावा लागतो बरं का!

👉 Diploma in Computer Application –
जर तुम्हाला कॉम्प्युटर सोबत खेळण्याची (गेम नव्हे, तंत्रज्ञान) आवड असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. या क्षेत्रात तुम्हाला Computer Software आणि Languages वर काम करायला मिळेल.

👉 Diploma in Interior Designing –
घर सजवायची आवड आहे? घरात नवनवीन प्रयोग करून घर सुंदर कसं ठेवता येईल हाच विचार तुम्ही सतत करत असाल, तर या क्षेत्रामध्ये तुम्ही चमकण्याचे चान्सेस जास्त आहेत.

👉 Diploma in Advertising and Marketing –
हे तर आजचं सर्वात आघाडीचं क्षेत्र. गेल्या काही वर्षांत हे क्षेत्र इतकं भरभराटीला आलं आहे की जाहिरात आणि मार्केटिंगच्या पलीकडे गेलं आहे. जर तुमच्याकडे संवाद कला आहे किंवा लोकांना कन्व्हिन्स करण्याची पॉवर आहे. तर या क्षेत्रात नशीब आजमावून बघण्यास हरकत नाही.

👉 Diploma in Various Languages –
या क्षेत्रात सहसा कोणी पाउल ठेवत नाही. कारण हे क्षेत्र तितकं फॅन्सी नाही. पण विश्वास ठेवा, यात करियर करण्यास तुम्हाला जास्त कॉम्पीटीशन नाही, तसेच पैसेही जबरदस्त मिळतात आणि परदेशातून संधी चालून आली तर जमलं की सगळं. हो पण तुम्हाला विविध भाषा शिकण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी मात्र ठेवावी लागेल.

असे अजून अनेक कोर्स आहेत, पण लक्षात ठेवा तुमच्या आवडीनुसारच कोर्स निवडा, आवड म्हणजे वरवरची नको. खरंच त्यात स्वत:ला झोकून देण्याची आणि मेहनत घेण्याची तयारी असेल आणि जे करताना तुम्हाला आनंद मिळेल असंच क्षेत्र करियर म्हणून निवडा, यातच तुमचे यश आहे!