शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

भावांमधील नाते


आईवडिलांना वाटायचे भावाला भाऊ पाहिजे, म्हणून अनेक घरात बरेच भावंडे असायचे. तसे लहानपणी भाऊ एकमेकांसाठी जीव टाकायचे. एकत्र खेळणे एकत्र कामे करणे विनोद करणे. शाळेत एकत्र जाणे. घरामध्येही दादा म्हणून मागे मागे फिरणे. एकमेकांची काळजी घेणे. एकाला लागले तर दुसर्‍याच्या डोळ्यात पाणी यायचे. एकमेकांचे कपडे घालणे. दादाही आपल्या लहान भावाची काळजी घ्यायचा. स्व:ताला कमी घेवून आपल्या भावाच्या गरजा पुरवायचा. आई सांगायची काही झालं तरी एकमेकांची साथ सोडायची नाही. तेही आईला वचन द्यायचे आम्ही कधीही साथ सोडणार नाही कितीही मतभेद झाले तरी. आईवडिलांनाही धन्य वाटायचे. भरून पावलो असं वाटायचे. एकमेकांसाठी त्यागाची भावना असायची. असे मजेत चालले असताना भावा भावामध्ये काय झाले.
      भावांचे लग्न झालेत व तेथूनच संबंधामध्ये दुरावा सुरू झाला. जमीनीच्या वाटणी मागू लागले एवढंच नाही एकाला थोडी जास्त जमिन गेली तर हमरितुमरी वर यायले लागले. कोर्टकचेर्‍या सूरू झाल्या. एकमेकांचे तोंड बघणे म्हणजे अपशकून असे मानू लागले. घरांच्या विभागणीवरून वाद निर्माण सूरू झालेत. आइवडिलांचा सांभाळ कुणी करायचा याबद्यल भांडणे सूरू झालेत. त्यांचा सांभाळ करण्यासाठी अधिक जमिन व पैसे याची मागणी करू लागलेत. बहिणींना दिवाळीला कोण साडी घेणार म्हणून बहिणींची वाटणी करायला लागलेत. आई एका भावाकडे व वडील दूसर्‍याकडे असे चित्र दिसू लागले. काहीवेळा मुले असूनही आईवडिल मुलीकडे दिसतात. काही वेळा सर्व असूनही आई वृद्धाश्रम मध्ये दिसते. वाटणीसाठी एकमेकांचा खून सूद्धा करतात. आज जर नजर टाकली तर ९५% भाऊ भाऊ एकत्र फिरतांना दिसत नाही व एकमेकाशी बोलतही नाही. एकमेकांच्या घरी जात नाही. काहीतर एवढे कट्टर असतात एकाचा मृत्यू झाला तर अंतविधिलाही जात नाही. एकमेकांच्या लग्न कार्याला जात नाही. एखाद्या भावाला अपघात झाला किंवा आजारपणामूळे अॅडमिट व्हावे लागले तर त्याला भेटायला न जाता वरून भोगेल अजून तो अशी भाषा वापरतात. एकाच आईच्या ऊदरात जन्म घेवून एवढी दुश्मनी कूठून घूसली कोण जाणे. आपण लहानपणी दिलेल्या आणाभाका सर्व विसरलेत. जो कुणी हा लेख वाचत असेल त्याने किंवा तिने विचार करा की आपण भावंडे खरंच बोलत नाहीत का. तसे असेल तर सारे विसरून फोन लावा व माफी मागा किंवा भेटायला जा. काही वर्षानंतर या पृथ्वीवर दोघं नसणार. परस्परांबद्दल आदर बाळगा. एक श्रीमंत असेल व दूसरा गरीब असेल तर ती दरी येवू न देता आपण भावंड आहोत याची जाणीव ठेवून एकमेकाबद्दल संबंध चांगले ठेवा. प्रेमाने दादा म्हणून हाक मारा. एकाने जरी केले तरी हे लिहिण्याचे सार्थक झाले असे मी म्हणेन.

माणुसकी हा एकच धर्म,,,,,,,,, मेल्यावर खांदा देऊन काय उपयोग,,,,,,जिवंत असताना हात द्या एकमेकांना,,,,