शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

जगण्यातील खरा आनंद



सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका निर्भेळ क्षणी एका खेडुत मुलीने त्यास सहजच प्रश्न विचारला, "भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार?" तो म्हणाला,"पुढचे देश जिंकीन आणि मजल दरमजल असं जिंकून मी जगज्जेता होईन." "मग काय करणार?" हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने विचारला. यावर तो म्हणाला,"मग काय, निवांतपणे जगेन." यावर ती मुलगी खुदकन हसत म्हणाली, मग आत्तापासूनच का निवांत जगत नाहीस? यातून सिकंदरला काय कळलं माहीत नाही; पण खरंच ही कहाणी बरंच काही सांगून जाते. आपणही असेच जगण्यातला निवांतपणा घालवून धावपळ करतोय, ती पुढे कधीतरी निवांत जगू या भाबड्या आशेवर. बऱ्याचदा इतरांना मागे टाकण्याच्या नादात आपल्याला आपलं वळण कधी येऊन गेलंं, याचं भानही रहात नाही.
 कितीही वेगाने पळालो तरी आपल्यापुढे कोणीतरी असणारच, कोणाजवळ काहीतरी वेगळे असणारच, कोणालातरी जास्त संधी मिळणारच, कोणाचंतरी वलय आपल्यापेक्षा अधिक  असणारच, कोणीतरी आपल्याहून सुंदर असणारच हे आपणा विसरतो. तेव्हा, लक्ष आपल्या स्वाभाविक ध्येयावर आणि  जगण्यावर केंद्रित करावं, आपली गती आपल्या प्रकृतीला साजेशी ठेवत आनंदाने जगत जावं; अन्यथा मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात आपण आयुष्याला वेगळ्या दिशेला नेऊन ठेवतो. म्हणून केवळ एकटं पुढे रहाण्यापेक्षा सवंगड्यांसोबत थोडं मागे राहिलेलं उत्तम नाही का? अन्यथा बऱ्याचदा यामुळे विनाकारण असुरक्षिततेची भावना वाढते, करायच्या राहून गेलेल्या गोष्टी आयुष्यात वैफल्य  निर्माण करतात.
 यासाठी पहिल्यांदा गरज आणि चैन यात फरक करणं नितांत गरजेचं आहे. इतर धावतायेत म्हणून आपणही धावणं ठिक नाही. जगणं हे राईसप्लेटसारखं असावं, त्यात कसं साऱ्या पदार्थांना आपापल्या मर्यादेत स्थान असतं आणि  त्यामुळेच ते रुचकर ठरतं. जर चटणीची जागा भाजीला दिली, तर ताटाचं संतुलन बिघडतं आणि  जेवणाचा गोंधळ उडतो. जगण्याचंही काहीसं असंच आहे, ते सर्वसमावेशक, चौफेर असेल, तर ते सुखकर ठरते. एखाद्या मोठ्या यशाच्या प्रतिक्षेत रोजच्या जगण्यातील छोटे छोटे आनंदाचे क्षण निसटून जाऊ देऊ नका, ते क्षण तेव्हाचे तेव्हाच जगून घ्या, लुटून घ्या.
आपल्या आवडीच्या व आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी आयुष्य पडलेय, हे पालुपद आयुष्यच कुरतडून टाकते, त्यामुळे ते क्षण वेचा. तारुण्यात शक्ती असते, वेळ असतो, पण पैसा नसतो. पुढे शक्ती असते, पैसा असतो; पण वेळ नसतो आणि उतारवयात वेळही असतो, पैसाही असतो पण शक्ती उरत नाही. यातील सुवर्णमध्य गाठून समरसून जगावं.
स्टीव्ह जॉब्स म्हणतात, हरवलेल्या वस्तु गवसतील; पण वेळ नाही. आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलावर पोचल्यानंतर "निरोगी कसं जगावं" हे पुस्तक वाचून काय उपयोग ?